नवी दिल्ली: आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महत्त्वाच्या विविध मुद्यांवर तसेच अर्थसंकल्पावर, सरकारच्या धोरणांवर केंद्र सरकारची बाजू भक्कमपणे मांडून संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे, विविध विभागांवर प्रश्नोत्तरे विचारणारे, संसदेतील उपस्थितीत अव्वल असणारे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा `संसद रत्न' पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.
प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि संसदरत्न अवॉर्ड कमिटी यांच्या वतीने देण्यात येणारा १६ वा संसद रत्न पुरस्कार २०२६ आज, बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील भीम हॉलमध्ये प्रदान आला.
भारत सरकारचे केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री तसेच ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई, पुरस्कार ज्युरी समितीचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या विशेष उपस्थितीत खासदार डॉ .श्रीकांत शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रवीण पटेल (भाजप, उत्तर प्रदेश), पी. पी. चौधरी (भाजप, राजस्थान), जगदंबिका पाल (भाजप, उत्तर प्रदेश), डॉ. निशिकांत दुबे (भाजप, झारखंड), डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना, महाराष्ट्र), बिद्युत बरन महतो (भाजप, झारखंड),
लुंबराम (भाजप, राजस्थान), हेमंत सावरा (भाजप, महाराष्ट्र), स्मिता वाघ (भाजप, महाराष्ट्र), डॉ. मेधा कुलकर्णी (भाजप, महाराष्ट्र), नरहरी अमीन (भाजप, गुजरात) यांचाही संसदरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.